कल्याण, मुरबाड, भिंवडी, शहापूर आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांमधील १५०० मधुमेहींच्या नेत्र व किडनी तपासणीच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयबेटिक्स फाऊंडेशन व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ठाण्याच्या टाऊन हॉलमध्ये हे शिबीर होणार आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने मधुमेही रुग्णांची तपासणी करण्याचा हा जगातील विक्रम ठरणार आहे. त्यामुळे या शिबिराची गिनिजबुकात नोंद होणार आहे. यापूर्वीदेखील ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी १०४१ रुग्णांनी लाभ घेऊन विक्रम केला होता. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आली असून शनिवारच्या शिबिरात हा विक्रम तोडला जाणार आहे.
मधुमेह हा अनुवांशिक आजार असून कोणत्याही जीवनशैली जगणाऱ्या व्यक्तींना त्याची लागण होते. त्याचा परिणाम डोळे आणि किडनीवर होण्याची शक्यता असते. परंतु त्यावर उपचार केल्यास हे दुष्परिणाम टाळता येऊ शकतात. त्यासाठी आयबेटिक्स फाऊंडेशन व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मधुमेहींसाठी विशेष शिबीर होणार आहे. या शिबिरात जिल्ह्यातील विविध भागांमधून येणारे सुमारे १५००हून अधिक रुग्ण सकाळी नऊ ते सायंकाळी ४ या वेळेत मोफत नेत्र व किडनी तपासणीचा लाभ घेऊ शकणार आहेत. मधुमेहींमध्ये नेत्र व किडनीचे आरोग्य महत्त्वाचे असून याबाबत जनजागृती व्हावी, असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयबेटिक्स फाऊंडेशन या संस्थेचे डॉ. निशांत कुमार यांनी केले आहे. या शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व महानगरपालिका, नगर परिषद, हाऊसिंग सोसायट्यांच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील २५०० रुग्णांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी किमान १५०० व्यक्ती या शिबिरामध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाम व आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, हिंदुजा रुग्णालयाचे डॉ. निशांतकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार उपस्थित राहणार आहेत.
गावागावांमधून थेट बसची सोय…
कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ या पाच तालुक्यांतून येणाऱ्या मधुमेही रुग्णांना ८० बसमधून आणले जाणार असून वाहनांमध्ये रुग्णास लागणाऱ्या पाणी व नाश्त्यासह औषधांचा इमर्जन्सी ट्रे उपलब्ध राहणार आहे. तर, शिबिराच्या ठिकाणी पाणी, चहा, जेवणासह मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. या शिबीरात पहिल्या टप्प्यात ठाणे मनोरुग्णालय येथून येणाऱ्या रुग्णांना तपासले जाणार असून त्यानंतर अन्य रुग्णांना तपासले जाईल. १५० डॉक्टर रुग्णांना सेवा देणार आहेत. रुग्ण घेऊन येणाऱ्या आशा सेविका व गटप्रवर्तक यांना प्रति रुग्ण १०० रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.